spot_img
spot_img

संग्रामपूरचा दत्ता सायकलवर निघाला… खिशात पैसा कमी, पण जिद्द हिमालयाएवढी; ३५ दिवसांत साडेतीन हजार किमी पार करून थेट लडाखमध्ये सुखरूप!

संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) घरची आर्थिक परिस्थिती नाजूक… व्यवसायाने जेसीबी चालक… पण मनात देशभक्ती, पर्यटनाची प्रचंड आवड आणि संपूर्ण भारत सायकलवरून पाहण्याची हटके जिद्द! संग्रामपूर तालुक्यातील ग्राम सावळा येथील २५ वर्षीय दत्ता पुंजाजी पुरकर या युवकाने आपल्या धाडसी प्रवासाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल ३५ दिवसांपूर्वी घरातून सायकलवर निघालेला दत्ता सध्या साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून लडाखमध्ये सुखरूप पोहोचला आहे.

बहऱ्हाणपूर, दिल्ली, पठाणकोट, वैष्णोदेवी, जम्मू असा खडतर मार्ग पार करत दत्ताने अखेर लडाख गाठले. हा प्रवास केवळ पर्यटनाचा नाही, तर जिद्द, धैर्य आणि आत्मविश्वासाची कहाणी आहे. पैसा नसला तरी स्वप्न मोठे असावे आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी, हे दत्ताने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

संपूर्ण भारत विविधतेने नटलेला आहे, तो जवळून पाहण्याची दत्ताची इच्छा होती. मात्र मोठ्या खर्चामुळे हे स्वप्न अवघड वाटत होते. पण हार न मानता त्याने सायकलने भारत भ्रमंती करण्याचा निर्धार केला. सायकल प्रवास आरोग्यासाठी चांगला आणि प्रदूषणमुक्त असल्याने दत्ताने आवश्यक कपडे, सायकल दुरुस्तीचे साहित्य आणि इतर साहित्य सोबत घेत हा प्रवास सुरू केला.

प्रवासात जिथे सोय होईल तिथे मुक्काम, साधे जेवण, आणि पुन्हा पुढचा टप्पा अशा पद्धतीने दत्ता मार्गक्रमण करत आहे. भ्रमणध्वनीवरून बोलताना त्याने सांगितले की, आणखी दोन महिन्यांनंतर तो आपल्या सावळा गावी परतणार आहे.

विशेष म्हणजे, दत्तासाठी हा पहिलाच सायकल प्रवास नाही. मागील वर्षीही त्याने उज्जैन, ओंकारेश्वर, खाटू श्याम, दिल्ली, ऋषिकेश, हेमकुंड, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि केदारनाथ असा हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला होता. संग्रामपूर तालुक्यातील या तरुणाची जिद्द आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!