बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मोबाईल हरवला म्हणजे तो कायमचाच गेला, अशी अनेकांची समजूत असते. मात्र बुलढाणा शहर पोलिसांनी ही समजूत खोटी ठरवत नागरिकांचा विश्वास आणखी दृढ केला आहे. अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ५० हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देत बुलढाणा शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या सर्व मोबाईलची एकूण किंमत सुमारे साडेसात लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलसह अत्याधुनिक तांत्रिक प्रणालीचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा मागोवा घेतला.
तपासादरम्यान हे मोबाईल मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती आणि जळगाव या विविध शहरांमध्ये वापरले जात असल्याचे उघड झाले. स्वस्त दरात मिळत असल्याने अनेकांनी हे मोबाईल अनोळखी व्यक्तींकडून विकत घेतल्याचेही समोर आले. पोलिसांनी संबंधितांकडून सर्व मोबाईल जप्त करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले.
महागडे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून बुलढाणा शहर पोलिसांच्या तांत्रिक कौशल्याचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हरवलेला मोबाईल शोधणे अशक्य नाही, योग्य वेळी तक्रार आणि CEIR पोर्टलवर नोंदणी केल्यास तो परत मिळू शकतो, असा विश्वास या कारवाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.










