चांडोळ (हॅलो बुलढाणा) शाळेचा पहिलाच दिवस… आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात थेट चिमुकल्यांच्या उत्साहात रमले! बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद समूह साधन केंद्र शाळा, चांडोळ येथे मंगळवार ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून, स्काऊट गाईड व लेझीम पथकासोबत वाजत-गाजत प्रभातफेरी काढण्यात आली.
इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या ५५ विद्यार्थ्यांचे सीईओ गुलाबराव खरात यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वाराला रंगीबेरंगी फुगे, तोरणे आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रत्येक नवागत विद्यार्थ्यांच्या पायांचे कुंकवात ठसे घेऊन शाळेतील पहिले पाऊल अविस्मरणीय करण्यात आले.
५५ विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश पाहून सीईओ खरात यांनी मुख्याध्यापक सचिन ताटू, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचे कौतुक केले. शासनाने या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड केल्याने गावकऱ्यांनी आपल्या मुलांचा प्रवेश याच शाळेत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी चेतन वाहीले, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










