सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) शहरातील अत्यंत वर्दळीच्या शिवाजी टी पॉईंट परिसरात नाल्याजवळ पडलेला मोठा खड्डा आता नागरिकांसाठी अक्षरशः जीवघेणा सापळा ठरत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून खड्डा पाण्याखाली लपून जात असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांचे अपघात होत असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
बाजारपेठेकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. नागरिक, व्यापारी, ग्राहक आणि वाहनचालकांना या खड्ड्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होत असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या समस्येबाबत मनसे जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन खड्डा बुजविण्याची व नाल्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.











