spot_img
spot_img

नेहमी म्हणायचे, “माझा मृत्यू सर्वांना चटका लावून जाईल…” अन् ते शब्द खरे ठरले! नमाजदरम्यान ‘बालू भाईं’चे निधन; डोणगाव हळहळलं!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) पहाटेची वेळ… मशिदीत फजरची नमाज… दोन रकात अदा केल्यानंतर अचानक अस्वस्थता जाणवली आणि काही क्षणांतच आयुष्याचा प्रवास थांबला! डोणगाव येथील प्रतिष्ठित फॅब्रिकेशन व वेल्डिंग कारागीर अक्रम शाह हनीफ शाह उर्फ बालू भाई (वय ५५) यांचे १ ऑक्टोबर रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

बालू भाई सकाळी साडेपाचच्या सुमारास फजरच्या नमाजसाठी मशिदीत गेले होते. दोन रकात नमाज अदा केल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने ते बाहेर आले. वजूखान्याजवळ बसले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगण्यात आले. उपस्थितांनी छातीवर दाब देऊन आणि कृत्रिम श्वास देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तातडीने डॉक्टरांकडे नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नमाजच्या वेळी आलेल्या मृत्यूला मुस्लिम समाजातील अनेक जण श्रद्धेने भाग्याचे मानतात. मात्र बालू भाईंच्या अचानक जाण्याने कुटुंबीय आणि मित्रांना मोठा धक्का बसला.

“माझा मृत्यू सर्वांना चटका लावून जाणारा ठरेल,” असे ते नेहमी म्हणायचे, अशी आठवण निकटवर्तीयांनी सांगितली. त्यांच्या निधनानंतर हे शब्द आठवून अनेकांचे डोळे पाणावले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत हिंदू-मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रोजच्या परिचयातील हा माणूस अचानक निघून गेल्याने त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी साश्रुनयनांनी निरोप दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!