बुलढाणा (हॅलो बुलढाणा) “मला शिक्षकांसाठी लढायचे आहे, कोणत्याही पक्षासाठी नाही!” अशी स्पष्ट भूमिका मांडत अमरावती शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांनी निवडणुकीच्या मैदानात आपला निर्धार व्यक्त केला. बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसह जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा ठळकपणे पुढे आणला.
अमरावती शिक्षक मतदारसंघात आतापर्यंत सहा निवडणुका झाल्या असून आगामी निवडणूक सातवी असल्याचे देवकर यांनी सांगितले. इतर जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळाले; मात्र बुलढाणा जिल्ह्याला अद्याप स्थानिक शिक्षक आमदार मिळाला नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “ही संधी आता माझ्या रूपाने चालून आली आहे,” असे सांगत त्यांनी शिक्षकांना जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वासाठी साथ देण्याचे आवाहन केले.
शिक्षकांच्या मतदारसंघात पक्षापेक्षा संघटनेची बांधिलकी महत्त्वाची! असे ठणकावत देवकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिले. एखाद्या पक्षाचे तिकीट मागता आले असते; मात्र शिक्षकांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचा मार्ग निवडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कपिल पाटील यांच्याप्रमाणे शिक्षकांची भूमिका ठामपणे मांडत विधानपरिषदेत त्यांचा आवाज बुलंद करणार असल्याचेही ते म्हणाले.
मतदानाविषयी बोलताना त्यांनी पसंतीक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. एकल संक्रमणीय मतदान पद्धतीमध्ये मतदारांना उमेदवारांसमोर १, २, ३, ४ असे पसंतीक्रम नोंदवता येतात, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी तणाव किंवा संभ्रमात न पडता दूरदृष्टी असलेला आणि सर्वसमावेशक काम करणारा उमेदवार निवडावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी संघटनेची ताकद आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. शिक्षक भारती हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगत संघटनेच्या उमेदवाराला प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले.
पक्षीय पाठबळापेक्षा शिक्षकांशी बांधिलकी आणि बुलढाण्याला प्रतिनिधित्व या दोन मुद्द्यांवर देवकरांनी आपल्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली. आता त्यांच्या आवाहनाला शिक्षक मतदार किती प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागले आहे.पत्रकार परिषदेला शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अशोक खोरखेडे आणि वायाळ सर उपस्थित होते.












Total Users : 3540685