जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी मडाखेड बुद्रुक येथे महिला शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी RHWE कार्यक्रमांतर्गत मंगळवार, २३ जून रोजी ग्रामपंचायत परिसरात या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
“कमी पावसात खरीप पिकांचे नियोजन” या विषयावर महिला शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मूग, उडीद, तीळ अशा कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड, सुधारित वाण, बीजप्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड-रोग व्यवस्थापन व आर्द्रता संवर्धन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या हवामानात शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी व उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमास ग्रामसेविका मांडोकर मॅडम, सदानंद धनोकार, दिनेश जाधव, मुकुंद वानखडे उपस्थित होते. प्राचार्य योगेश गवई, उपप्राचार्य सतीश धर्माळ, प्रा. प्रितेश वानखडे व प्रा. जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले. साक्षी क्षीरसागर, मानसी इखारे, साक्षी हुसे, आकांक्षा कांबळे, शारदा काळे, गायत्री घोंगे व निकिता सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले. महिला शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहितीचा शेतीत उपयोग करण्याचा संकल्प केला.











