देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित कृषी समृद्धी नव नगरांचा बहुप्रतिक्षित मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाने गुरुवारी याबाबत शासन निर्णय जारी केल्याने देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील विकासाला नवी दिशा मिळणार आहे. आमदार झाल्यापासूनच मनोज कायंदे यांनी या रखडलेल्या प्रकल्पासाठी सातत्याने आक्रमक पाठपुरावा केला. अधिवेशनात आवाज उठवून मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न लावून धरला. संबंधित विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांनाही एकत्र करून त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला.
या प्रकल्पामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि बेरोजगार युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. उद्योग व्यवसाय वाढल्यास या भागातील अर्थकारणाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच महिन्यात झालेल्या हवाई सर्वेक्षणानंतर शासनाने निर्णय घेतल्याने प्रकल्प मार्गी लागण्याचे संकेत मिळाले आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद, माळ सावरगाव तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील अंभोरा, असोला, बामखेड, बोरखेडी बावरा, गिरोली बुद्रुक, गिरोली खुर्द, गोळेगाव, जांभोरा, जवळखेड, कुंभारी, निमखेड, पळसखेड मलकदेव, पळसखेड झालटा, पिंपळनेर, तुळजापूर, उंबरखेड या गावांचा समावेश करण्यात आला आहे. आमदार कायंदेंच्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.











