spot_img
spot_img

विजेच्या एका झटक्याने तहसील कार्यालय ठप्प; शेतकरी-विद्यार्थ्यांची फरफट, प्रशासन मात्र बघ्याची भूमिका!

मेहकर (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) हलक्या पावसानेच मेहकर तहसील कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण शासकीय कामकाज अक्षरशः ठप्प पडले. २२ जून रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान वीज गेल्यानंतर सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारासच पुरवठा सुरळीत झाला. तब्बल तीन ते चार तास वीज नसल्याने अभिलेखागार, नक्कल विभागासह विविध विभागांतील कामे बंद पडली.

शैक्षणिक प्रवेश आणि शेतीचा हंगाम सुरू असल्याने दाखले, नक्कल व कागदपत्रांसाठी ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक सकाळपासून तहसील कार्यालयात रांगा लावून बसले होते. मात्र “वीज नाही, दोन दिवसांनी या” अशी उत्तरे मिळाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. नक्कल विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आधीच कामाचा खोळंबा होत असताना विजेच्या लपंडावाने जनतेच्या त्रासात भर पडली आहे.

सरकारी कार्यालयात साधी इन्व्हर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था नसणे ही प्रशासनाची मोठी नामुष्की आहे. नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवणाऱ्या या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयात तात्काळ पर्यायी वीज व्यवस्था करावी आणि रिक्त पदे भरावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!