spot_img
spot_img

BREAKING! मुंबईच्या विराज प्रोफाईल्स कंपनीतील कथित मानसिक छळाला कंटाळून बुलढाण्याच्या इंजिनियरची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नावे, नऊ जणांवर कठोर कारवाईची मागणी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बोईसर येथील नामांकित विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील कंपनीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले बुलढान्यातील प्रदीप सुखदेव जाधव यांनी कथित मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने जाधव कुटुंबीयांसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे मृतक प्रदीप जाधव हे वरिष्ठ पत्रकार संजय जाधव यांचे कनिष्ठ बंधू असल्याने पत्रकार बांधवही आता जाधव कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप जाधव हे गेल्या सात वर्षांपासून विराज प्रोफाईल्स कंपनीत जबाबदार पदावर कार्यरत होते. मात्र कंपनीतील काही वरिष्ठांकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कंपनीचे मालक नीरज कोच्चर, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग यांच्यासह एकूण नऊ जणांवर जाधव कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे प्रदीप जाधव मानसिकदृष्ट्या प्रचंड दबावाखाली होते, असा आरोप त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

१९ जून रोजी प्रदीप जाधव यांना कंपनी मालकाच्या बंगल्यावर बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्या ठिकाणी झालेल्या बैठकीत त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून मानसिक दबाव आणण्यात आला आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर प्रदीप जाधव आपल्या फ्लॅटवर गेले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असून, त्या नोटमध्ये कथित त्रास देणाऱ्यांची नावे नमूद असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली. पत्नी वंदना प्रदीप जाधव यांच्या तक्रारीवरून बीएनएस कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र जाधव कुटुंबीयांची भूमिका स्पष्ट आहे केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना तातडीने अटक झालीच पाहिजे.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. विधानसभा अधिवेशनात हा विषय मांडून प्रदीप जाधव यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खासगी कंपन्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणारा मानसिक छळ हा गंभीर सामाजिक प्रश्न बनला असून, सरकारने अशा प्रकरणांवर कठोर कायदा आणि कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

आता बोईसर पोलीस पोस्टमार्टम अहवाल, तक्रार आणि सुसाईड नोटच्या आधारे विराज प्रोफाईल्स कंपनीच्या मालकासह संबंधित नऊ जणांवर नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रदीप जाधव यांना न्याय मिळणार की हे प्रकरणही फाईलमध्ये दडपले जाणार? हा संतप्त सवाल आता पत्रकार बांधवांसह सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, हीच जाधव कुटुंबीयांसह पत्रकार बांधवांची ठाम मागणी आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!