spot_img
spot_img

पिंपरी सरहद्द हादरली! २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून घातपाताचा संशय, चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल!

डोणगाव/रिसोड (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अभिषेक विष्णू वाघ, वय २४, रा. उकीरखेडा, ता. रिसोड असे मृतक युवकाचे नाव आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास अभिषेकला जेवणासाठी बाहेर जाण्याचे सांगून पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ नेण्यात आले. तेथे जुन्या वादाच्या रागातून कोणत्यातरी जड हत्याराने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर वार करण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. गंभीर जखमी अवस्थेत अभिषेकवर प्रथम सिग्मा हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृतकाचे वडील विष्णू गोविंदा वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद विनोद मवाळ, प्रतिक संतोष हुंबाड, पवन गजानन दांदडे सर्व रा. महागाव, ता. रिसोड आणि शुभम शेषराव अवचार रा. अंजनी बु., ता. मेहकर, जि. बुलढाणा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. तसेच महिनाभरापूर्वी कामावर येण्याच्या कारणावरून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्याच वैमनस्यातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, संशयितांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून, चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. वाशिम पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इमरानखान पठाण पुढील तपास करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!