जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर)
शेतीतील वाढता खर्च, रासायनिक खतांचा अतिरेक आणि उत्पादनातील अस्थिरता या पार्श्वभूमीवर आता मृदा परीक्षणाचे महत्त्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरत आहे. याच उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नीत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ४ जून २०२६ रोजी जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड बु. येथे मृदा नमुना संकलन व शेतकरी मार्गदर्शन उपक्रम राबविला.
या उपक्रमात विद्यार्थिनींनी शेतकरी उखर्डा हागे यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देत विविध ठिकाणांहून मातीचे नमुने संकलित केले. केवळ अंदाजावर खतांचा मारा करण्याऐवजी जमिनीची खरी गरज ओळखूनच खत व्यवस्थापन करणे काळाची गरज असल्याचे विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना पटवून दिले. मृदा परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सेंद्रिय कर्ब, सामू अर्थात पीएच, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती मिळते. त्याआधारे संतुलित खतांचा वापर करून उत्पादन वाढविता येते आणि अनावश्यक खर्चही टाळता येतो, असे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांशी संवाद साधत माती परीक्षणाचे फायदे, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय, शाश्वत शेती, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान याबाबत सविस्तर माहिती दिली. संकलित मृदा नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमास शेतकरी उखर्डा हागे, पवन कड, उपसरपंच कैलास सोनोने यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई, उपप्राचार्य सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे, विषयतज्ज्ञ प्रा. अक्षदा देशमुख व प्रा. जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमासाठी साक्षी क्षीरसागर, मानसी इखारे, साक्षी हुसे, आकांक्षा कांबळे, शारदा काळे, गायत्री घोंगे आणि निकिता सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले.










