बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुलढाणा शहरातील संघटनात्मक बांधणीला नवी धार देत एकाचवेळी दोन महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांची दणदणीत नियुक्ती केली आहे. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुलढाणा शहर संपर्कप्रमुखपदी सुनील ऊर्फ जालूभाऊ भाग्यवंत, तर शहराध्यक्षपदी विजय राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या नियुक्त्यांमुळे बुलढाणा शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून तळागाळातील कार्यकर्त्यांशी मजबूत संपर्क निर्माण करणारे भाग्यवंत आणि राऊत यांनी जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.
अन्यायाविरोधात आवाज उठवणे, जनसमस्यांसाठी रस्त्यावर उतरणे आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडणे, या कार्यपद्धतीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी शहर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पक्षप्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके, उपजिल्हा संपर्कप्रमुख डी. एस. लहाने, तालुकाध्यक्ष लखन गाडेकर, जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती जाहीर करण्यात आली. नव्या नेतृत्वामुळे बुलढाण्यात ठाकरे सेनेचा आवाज अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.











