spot_img
spot_img

BREAKING जळगाव जामोद ‘सरकटी लाश’ प्रकरणात थेट DGP मैदानात! बनावट तपासाच्या धुरळ्यानंतर बुलढाणा पोलिसांची उद्या खरी अग्निपरीक्षा; DGP सदानंद दाते विचारणार – ‘चूक नेमकी कुणाची?’

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या ‘सरकटी लाश’ हत्याकांडाने आता थेट राज्याच्या गृहविभागाचे लक्ष वेधले आहे. या अतिगंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते उद्या ८ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत असून, जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तपासाचा थेट आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात अक्षरशः खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात सुरुवातीपासूनच तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मृतदेहाची ओळख पटलेली नसताना तपासाचा गोंधळ, नंतर कथित मृत व्यक्तीच जिवंत असल्याचे समोर येणे आणि बनावट तपासाचे आरोप यामुळे बुलढाणा पोलिसांची विश्वासार्हता महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही चर्चेचा विषय ठरली. तब्बल नऊ अधिकारी आणि २६ अंमलदारांची टीम तपासात असतानाही मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही, ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

DGP दाते यांचा दौरा केवळ औपचारिक नसून, केस डायरी, स्टेशन डायरी, फॉरेन्सिक नमुने, आंतरराज्य तपासाची दिशा आणि आतापर्यंत पोलिसांनी उचललेली कायदेशीर पावले यांचे बारकाईने परीक्षण होण्याची शक्यता आहे. २६ एप्रिलला मृतदेह मिळूनही गुन्ह्याची ठोस उकल का झाली नाही? सुरुवातीच्या तपासात हलगर्जीपणा झाला का? खोटा तपास कोणी आणि का केला? ‘चूक नेमकी कुणाची?’ या प्रश्नांची उत्तरे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.

या दौऱ्यानंतर तपासात निष्काळजीपणा किंवा बनावटपणा आढळल्यास काही अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा सक्तीच्या बदल्यांची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘सरकटी लाश’ प्रकरणातील मारेकरीच नव्हे, तर संपूर्ण पोलीस यंत्रणाही धास्तावली आहे. सातपुड्याच्या कुशीत दडलेले हे भयावह रहस्य DGP दाते यांच्या हस्तक्षेपानंतर उघड होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!