देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देत त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी देऊळगाव राजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने अलीम्को तपासणी अंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य व सहाय्यक साधनांचे वितरण करण्यात आले.
दि. 1 जून रोजी पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज देवानंद कायंदे यांच्या मातोश्री तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नंदाताई कायंदे यांच्या शुभहस्ते 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना तब्बल 31 साहित्य व सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी गटविकास अधिकारी मुकेश माहोर, सहाय्यक गटविकास अधिकारी विशाल चौधर, गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण सपकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी दादाराव मुसदवाले, केंद्रप्रमुख सोनुने, प्रशासन अधिकारी गजानन वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग विद्यार्थी हे समाजाचे महत्त्वाचे घटक असून त्यांना योग्य साधने, शिक्षण आणि संधी मिळाल्यास तेही यशाचे शिखर गाठू शकतात, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










