बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माळविहीर ग्रामपंचायत हद्दीतील विस्तारित क्षेत्र असलेल्या वृंदावन नगरमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सौ. निशा अरविंद पावडे यांच्या गल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नसल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी शासनाचा संपूर्ण महसूल भरूनही त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत असल्याचे पंचायत समितीच्या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
पंचायत समिती, बुलढाणा येथील गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी / प्रशासक, माळविहीर यांना थेट पत्र देत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. पाणी सोडण्याच्या दिवशीच पाईपलाईन फुटते, त्यामुळे नागरिकांना पुन्हा पुन्हा त्रास सहन करावा लागत आहे. जलजीवन मिशनच्या संबंधित विभागानेही पाणी सोडण्यापूर्वी दोन दिवस आधी कळविण्याचे पत्र दिले होते; मात्र त्यावरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे पत्रातून दिसते.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायत सचिव आणि पाणीपुरवठा कर्मचारी यांनीच पंचायत समितीच्या दालनात ग्रामपंचायतीमार्फत सोडण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितल्याचा उल्लेख आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारी आहे. भविष्यात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले किंवा जीवितहानी झाली, तर त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, जलजीवन मिशनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरितही झालेली नाही. त्यामुळे सध्याचा पाणीपुरवठा करणे ही थेट माळविहीर ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. पाणीपट्टी कर ग्रामपंचायत वसूल करते, मग नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.










