नांदुरा (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील खुमगाव रेल्वे स्थानकाजवळ आज संध्याकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. खुमगाव येथील लताबाई नारायण सांगळकर वय ५० या महिलेचा महाराष्ट्र एक्सप्रेसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे या दुर्घटनेत त्यांच्या सोबत असलेल्या १८ बकऱ्यांचाही रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला आहे.
आज दिनांक ३१ मे २०२६ रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास लताबाई सांगळकर या आपल्या बकऱ्यांसह खुमगाव रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरून जात होत्या. याचवेळी वेगाने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसचा अंदाज न आल्याने त्या रेल्वेखाली सापडल्या. क्षणार्धात काळाने झडप घालत लताबाईंसह त्यांच्या जिवापाड जपलेल्या १८ बकऱ्यांचा जीव घेतला.
बकऱ्या वाचवण्याच्या प्रयत्नात लताबाई स्वतःच मृत्यूच्या दाढेत सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरील दृश्य इतके विदारक होते की उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली आणि खुमगाव-नांदुरा परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली.
घटनेची माहिती मिळताच ओम साई फाऊंडेशनचे विलास निबोळकर, आश्विन फेरण, विष्णू धांडे, कमलेश बोके, दीपक फाळके, संजय शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या कामी डॉ. सचिन साठे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
दरम्यान, नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक गजानन इंगळे व संजय वराडे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. उपस्थानक प्रबंधक, नांदुरा यांनीही घटनेची अधिकृत नोंद घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे.
लताबाई सांगळकर यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण खुमगाव आणि नांदुरा परिसर शोकसागरात बुडाला आहे.










