नांदुरा (हॅलो बुलढाणा / ज्ञानदेव राजनकर) तालुक्यातील खळदगाव येथे आज एक दुर्दैवी घटना उघडकीस आली. खळदगाव येथील ६९ वर्षीय वृद्धाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोविंदा सुखदेव तायडे वय ६९, रा. खळदगाव, ता. नांदुरा असे मृत वृद्धाचे नाव आहे.
आज दिनांक ३१ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास मानेगाव पुलाजवळील पूर्णा नदीच्या पात्रात गोविंदा तायडे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मृतकाचे पुत्र कैलास गोविंदा तायडे यांनी तातडीने जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठले आणि तोंडी रिपोर्ट दिला.
या रिपोर्टवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून कायमी मर्ग क्रमांक ३४/२०२६, कलम १९४ बी.एन.एस.एस. अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात गोविंदा तायडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या आदेशानुसार बिट अंमलदार अतुल मोहाळे पुढील तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खळदगाव परिसरात शोककळा पसरली आहे.










