ज.जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) रोहिणी नक्षत्र सुरू झालेले असताना रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी अचानक आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने जळगाव जामोद तालुक्यातील तुळजा तरोडा, सुनगाव, जामोद,जळगाव परिसरातील केळी व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अवघ्या एक तासाच्या थैमानात शेकडो एकरवरील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 31 मे रोजी सकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. विशेषतः रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या या वादळामुळे केळीची तयार झाडे खोड मोडून घड जमिनीवर कोसळले. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
सहा महिने कष्ट करून जोपासलेली बाग एक तासात होत्याचे नव्हते झाले.
बळीराजाच्या या संकटाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन तात्काळ पंचनामा करून पीक विमा व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी मदत न मिळाल्यास आणखी खचून जाईल,अशी भीती व्यक्त होत आहे.












Total Users : 3546190