धाड (हॅलो बुलढाणा) करडी फाट्यावरील भोंडे पेट्रोल पंपावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तब्बल 1 लाख 5 हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांतच छडा लावला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीने स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय 19, रा. मोंढाळा, ता. जि. बुलढाणा) याला शिताफीने ताब्यात घेत चोरीला गेलेली संपूर्ण ₹1,05,000 ची रोकड हस्तगत केली.
15 ते 16 जुलै 2026 च्या मध्यरात्री भोंडे पेट्रोल पंपावरून रोकड चोरीला गेल्यानंतर खंडू संतोषराव भोंडे यांच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताला जेरबंद केले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती असून, चोरीचा 100 टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. आशीष रोही, पीएसआय प्रताप बाजड व एलसीबी पथकाने केली. पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.










