spot_img
spot_img

BIG BREAKING जळगाव जामोद ‘शीरविहीन मृतदेह’ प्रकरणात मोठी कारवाई! ‘मृत’ घोषित केलेली शिवानी जिवंत निघाल्याने खळबळ; LCB प्रमुखांसह पाच जणांची उचलबांगडी, जळगाव जामोद ठाणेदारांचीही बदली!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर)संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या शीरविहीन तरुणीच्या कथित खून प्रकरणात आता धक्कादायक घडामोडी घडत असून बुलढाणा LCB पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. ज्या विवाहित तरुणीचा खून झाल्याचा दावा करून तिच्या वडील व भावाला अटक करण्यात आली होती, तीच तरुणी जिवंत समोर आल्याने एलसीबीच्या तपासाचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणीचा शीर व धड वेगळा केलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यप्रदेशातील खडकी येथील बेपत्ता विवाहित महिला शिवानी कळमेकर हिचाच तो मृतदेह असल्याचा निष्कर्ष काढला. एवढेच नव्हे तर शिवानीच्या कथित हत्येप्रकरणी तिचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना अटकही करण्यात आली.

मात्र संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले, जेव्हा शिवानी स्वतः जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली. त्यामुळे एलसीबीच्या तपासातील अक्षम्य निष्काळजीपणा आणि घाईघाईने केलेल्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर तपास पथकातील उपनिरीक्षक पंकज सपकाळे तसेच पोलीस अंमलदार एजाज खान, अमोल शेजोळ आणि अजीस परसूवाले यांची पोलीस नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक श्रौणिक लोढा करणार आहेत.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक मोठी प्रशासकीय हालचाल झाली असून जळगाव जामोदचे ठाणेदार नितीनकुमार पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!