बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील ढासाळवाडी शिवारात गावाच्या स्मशानभूमीजवळील ई-क्लास जमिनीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दि. 27 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. स्थानिक नागरिकांना स्मशानभूमीजवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आल्यानंतर तात्काळ रायपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 55 वर्षे असून त्याचा रंग सावळा, उंची सुमारे 5 फूट आहे. अंगात पांढरा शर्ट, निळसर रंगाची पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी, गळ्यात मोठा पांढरा रुमाल तसेच पायात काळ्या रंगाच्या चप्पला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र मृतकाजवळ कोणतेही ओळखपत्र अथवा कागदपत्र आढळून आले नसल्यामुळे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
सदर मृतदेह पुढील तपासासाठी सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील शवागारात ठेवण्यात आला आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ रायपूर पोलीस स्टेशन, जि. बुलढाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.










