साखळी बु. (हॅलो बुलडाणा) गावात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयावर रिकाम्या घागरींसह जोरदार मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. विजया अनिल कोळसे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या ‘घागर मोर्चा’त शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते. “पाणी द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा” अशा संतप्त घोषणा देत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला अक्षरशः वेढा घातला.
साखळी बु. येथे यापूर्वी जलस्वराज्य योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी, विहीर, पाइपलाइन आदी कामे पूर्ण करण्यात आली. मात्र एवढा मोठा निधी खर्च होऊनही गावात आजपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात शेतातील विहिरी व अजिसपूर शिवारातून डोक्यावर घागरी वाहून पाणी आणावे लागत असल्याने गावकऱ्यांचा संयम अखेर संपला. ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
दरम्यान, आंदोलनाची तीव्रता वाढताच प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत येत्या आठ दिवसांत येळगाव धरणावरून गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे अधिकृत आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मात्र, दिलेल्या मुदतीत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकून यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ. विजया कोळसे आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.










