जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर)मिशन परिवर्तन अंतर्गत जळगाव जामोद पोलिसांनी अवैध गांजा तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. दि. 26 मे 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता खेर्डा रोडवरील कॉटन मार्केट येथे नाकाबंदी दरम्यान 1,18,500 रुपयांचा 2 किलो 300 ग्रॅम गांजा, बजाज प्लॅटिना गाडी, 7,200 रुपये रोख व 12,000 रुपयांचा रेडमी मोबाईल असा एकूण 2,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सपोनि नागेश मोहोड, पोउपनि नारायण सरकटे, पोउपनि अमोल पंडित, पोहवा/504 इरफान, पोकाॅ/448 सचिन राजपुत, पोकाॅ/761 झाल्टे हे नाकाबंदी करत असताना एक इसम हा कुर्हा काकोडा ता. मुक्ताई नगर जि. जळगाव येथून गांजा घेऊन दानापूर येथे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे वाहनांची तपासणी करत असताना एम.एच 30 बी.क्यु 0245 क्रमांकाचे वाहन येताना दिसले. वाहन थांबवून चालकास नाव विचारले असता त्याने उत्तम शहादेव तायडे, वय 55 वर्षे, रा. दानापुर ता. तेल्हारा जि. अकोला असे सांगितले. गाडीची डिक्की तपासली असता एका पिशवीत गांजा मिळून आला.
आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अप क्र. 338/2026 कलम 8 (क) व 20 (ब) (ii) 29 NDPS अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक खामगांव डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.










