केनवड (हॅलो बुलढाणा) मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सरहद्द येथे बुधवारी (20 मे) सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव राधेश्याम वामन इंगळे (वय 42) असे असून संतोष शिंदे (वय 40) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील रहिवासी आहेत. मेहकर तालुक्यातील नागापूर येथे लग्न समारंभ आटोपून परत येत असताना त्यांच्या दुचाकी (MH-37 U-7031) ला भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की राधेश्याम इंगळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने संताप अधिकच वाढला आहे. नागरिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला, मात्र तब्बल अर्धा ते पाऊण तास रुग्णवाहिका न पोहोचल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर 102 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी संतोष शिंदे यांना वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.










Total Users : 3275566