बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा गंभीर चर्चेत आली असून रुग्णवाहिका सेवा आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या दयनीय अवस्थेवर मोठा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीचा पाढाच वाचला.
जिल्ह्यात तब्बल 16 रुग्णवाहिका चालकांची पदे रिक्त असल्याने अनेक शासकीय रुग्णवाहिका धूळ खात उभ्या आहेत. परिणामी गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसून खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र बनली असून वेळेवर रुग्णवाहिका नाही हीच नागरिकांची मोठी वेदना ठरत आहे.
दुसरीकडे मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे कोट्यवधी खर्चून उभारलेली आरोग्य केंद्राची इमारत गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. डॉक्टर, कर्मचारी आणि सुविधा नसल्याने हे केंद्र अद्याप सुरूच झालेले नाही.
या सर्व मुद्द्यांवर शैलेश सावजी यांनी ठामपणे भूमिका मांडत तातडीने चालक भरती आणि आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली. आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले.










