spot_img
spot_img

बुलढाण्यात इंधनासाठी ‘युद्ध’सदृश स्थिती! प्रशासनाचे शांततेचे आवाहन; ९६० KL पेट्रोल,१५ हजार किलो गॅस… तरीही रस्त्यांवर हाहाकार का?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात कथित इंधन टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला असून, पेट्रोल पंपांवर अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुठे दीड-दोन किलोमीटर लांब रांगा, तर कुठे किरकोळ कारणावरून वादावादी आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने स्पष्ट शब्दांत घाबरू नका, जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे असे आवाहन केले आहे.

निवासी जिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात ९६० किलोलीटर पेट्रोल, १,५७२ किलोलीटर डिझेल आणि तब्बल १५,९६९ किलो गॅससाठा उपलब्ध आहे. हा साठा जिल्ह्याच्या दैनंदिन गरजांसाठी पूर्णतः पुरेसा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मागणीमध्ये अचानक २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदवले आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर तात्पुरती गर्दी निर्माण झाली असली तरी पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा इशारा देत सांगितले आहे की, नागरिकांनी वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवून ठेवू नये. तसेच पेट्रोल पंप चालकांनी आपल्या ठिकाणी स्पष्ट माहिती फलक लावून नागरिकांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करावा, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!