देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/संतोष जाधव) शहरापासून काही अंतरावर असलेला जिल्ह्यातील सर्वात मोठा संत चोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्प जवळ असूनही देऊळगाव राजा शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाविरोधात अखेर शहरवासीयांचा संयम सुटला आणि आज मंगळवार, दि. 19 मे रोजी सकाळी 10:30 वाजता नगरपालिकेवर विराट हंडा मोर्चा धडकला.
मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर शहरातील महिला, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “धरण उशाशी, कोरड घशाशी”, पाणी आमचा हक्क आहे अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला. डोक्यावर रिकामे हंडे घेऊन महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
मोर्चा थेट नगरपालिकेवर धडकल्यानंतर वातावरण अधिकच तापले. सत्ताधारी प्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगराध्यक्षा माधुरीताई शिपणे व मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
यावेळी जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणी स्वच्छ करण्यासाठी आवश्यक मूलभूत उपकरणे उपलब्ध नसल्याने तसेच विद्यमान व्यवस्था क्षमतेपेक्षा कमी असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
पाणीपुरवठ्याच्या या ढिसाळ व्यवस्थेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोर्चात मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते.










