रायपूर (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) शनि अमावस्या निमित्त सैलानी दर्गा येथे हजारो भाविकांची उसळलेली गर्दी आणि त्यातून निर्माण झालेली प्रचंड वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर रायपूर पोलिसांनी अक्षरशः ‘एक्शन मोड’ घेतला. रायपूर ते सैलानी महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ झाल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली.
कडक उन्हात तासन्तास उभे राहून पोलीस हवालदार अख्तर शेख व देविदास दळवी यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र नियम तोडणाऱ्यांना पोलिसांनी अजिबात सवलत दिली नाही. हेल्मेट नसणे, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, कागदपत्रे अपूर्ण अशा बेफिकीर चालकांवर तात्काळ कारवाई करत १३,९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिसांनी केवळ दंडच नाही तर वाहनचालकांना नियमांचे महत्त्वही पटवून दिले. वेगावर नियंत्रण ठेवा, हेल्मेट-सीट बेल्ट वापरा, नियम पाळा, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. सण-उत्सवांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा कठोर मोहिमा यापुढेही सुरूच राहणार, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.










