देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) शहरात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त असताना प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. एकीकडे नागरिकांना १५-१५ दिवसांनीही पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे फुटलेल्या पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी सर्रास नाल्यात वाहताना दिसत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली पाईपलाईन प्रत्यक्षात ‘नासाडी प्रकल्प’ ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
निवडणुकीपूर्वी ‘दर ३-४ दिवसांनी पाणी’, ‘शहराचा पाणीप्रश्न कायमचा संपवू’ अशा घोषणा देत सत्तेत आलेले नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नगरसेवक आता मात्र पूर्णपणे गायब असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांच्या डोळ्यांसमोर पाणी वाया जात असताना संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे.
शहरात नवीन पाईपलाईनचे काम मोठ्या गाजावाजात करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी रस्ते उखडून ठेवलेले आहेत, गळती थांबलेली नाही आणि पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी नागरिकांना दुहेरी फटका बसत आहे.एकीकडे रस्त्यांची दुर्दशा, तर दुसरीकडे पाण्यासाठी वणवण.
‘दुरुस्तीसाठी निधी नाही’ असे कारण देत प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने संताप अधिकच वाढला आहे. गेल्या २० वर्षांपासून पाणीटंचाईचा प्रश्न कायम असताना प्रत्येक निवडणुकीत त्याच मुद्द्यावर राजकारण केले जाते, पण प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शून्यच राहतात.










