जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा / ज्ञानदेव राजनकर)पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूविरोधात धडाकेबाज कारवाई करण्यात आली असली तरी परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर पूर्ण लगाम बसला का, असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी १७ मे रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत एकूण ७,५५८ रुपयांचा दारूसाठा जप्त केला आणि दोन आरोपींना रंगेहात पकडले.
खांडवी येथील ‘साई ढाबा’वर टाकलेल्या धाडीत राजेश राठोड याच्याकडून ५,२०३ रुपयांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. तर पळशी सुपो येथे मरिभान गवई याच्या घरातून २,३५५ रुपयांची दारू व बिअर हस्तगत करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत मद्यबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मात्र, ही कारवाई फक्त दिखावा तर नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण खांडवी बीटमध्ये जुगार अड्डे, हातभट्टी आणि अवैध दारू विक्री उघडपणे सुरू असल्याचे नागरिकांचे आरोप आहेत. काही पोलिसांच्या कथित आशीर्वादामुळेच हे धंदे फोफावत असल्याची खळबळजनक चर्चा आहे.एकीकडे धाडी, तर दुसरीकडे सुळसुळाट यामुळे पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उभे राहत असून, वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.










