spot_img
spot_img

EXCLUSIVE बुलढाणा कलेक्टर ऑफिसमध्ये बदलीचा खेळ! नियमांना केराची टोपली? १०-१५ वर्षे एकाच खुर्चीत कर्मचारी; बदली की ‘सेटिंग’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी बदली प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नियमांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उमाळी (ता. मलकापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते  इंगळे यांनी थेट राज्याच्या महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल करत प्रशासनाला धक्का दिला आहे.

इंगळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बदली अधिनियम 2005 तसेच शासनाच्या विविध निर्णयांचे उल्लंघन करून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठेवले जात आहे. काही कर्मचारी 10 ते 15 वर्षांपासून मुख्यालयातच कार्यरत असून, त्याच ठिकाणी त्यांची बदली व पदोन्नतीही करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध आस्थापनांमध्ये केवळ अंतर्गत बदल्या करून कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात त्याच कार्यालयात ठेवले जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे बदलीच्या नियमांचा उद्देशच फोल ठरत असल्याची टीका करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, काही प्रकरणांमध्ये कर्मचारी दुसरीकडे बदली दाखवून प्रत्यक्षात मूळ ठिकाणीच काम करत असल्याने शासनाचा आर्थिक तोटा होत असल्याचाही आरोप आहे.

सन 2021 ते 2025 या कालावधीत झालेल्या सर्व बदल्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी इंगळे यांनी केली आहे. तसेच 6 वर्षांपेक्षा जास्त कालावधी एकाच मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून आता शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!