बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात सध्या इंधन टंचाईने अक्षरशः भीषण रूप धारण केले असून नागरिकांचे हाल अनावर झाले आहेत. पेट्रोल-डिझेलसाठी जिल्ह्यातील बहुतांश पंप कोरडे पडले आहेत, तर ज्या ठिकाणी थोडेफार इंधन उपलब्ध आहे तिथे पहाटेपासून रात्रीपर्यंत वाहनांच्या किलोमीटरभर रांगा लागत आहेत. रणरणत्या उन्हात तासन्तास थांबूनही इंधन मिळेल याची खात्री नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
या टंचाईने आता धोकादायक वळण घेतले असून इंधनासाठी थेट हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे डिझेल भरण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीतच ८ ते १० जणांच्या टोळक्याने एका वाहनधारकाला बेदम मारहाण केली. शेकडो लोकांचा जमाव आणि मोजके पोलीस यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र दिसून आले.
पेट्रोल पंपांवर “इंधन नाही” अशा पाट्या लावलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी कर्मचारीच अनुपस्थित असल्याने नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे. तर इंधन आले की अचानक उसळणारी गर्दी आणि गोंधळ यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. महासत्ता होण्याच्या दाव्यांमध्ये वास्तव मात्र वेगळेच असल्याची टीका होत आहे. इंधन टंचाईमुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्याची मागणी जोर धरत आहे.










