spot_img
spot_img

मोताळ्यात धाडसी एटीएम फोडून ७ लाखांची लूट; पोलिस यंत्रणेला चोरट्यांचे खुले आव्हान!

मोताळा (हॅलो बुलडाणा) शहरात तहसील कार्यालय चौक परिसरातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री धाडसी हातसफाई करत तब्बल ७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या थरारक घटनेमुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एटीएम मशीन फोडून रोकड काढून नेली. सकाळी नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तात्काळ बोराखेडी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा करत तपास सुरू केला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची कसून पाहणी करून तपासाची दिशा ठरवली आहे.

एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्याची बारकाईने तपासणी सुरू आहे. मात्र अद्याप आरोपींचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. शहरात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे बँक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!