मेहकर (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात सध्या डायरियाने अक्षरशः थैमान घातले आहे. दूषित पाण्यामुळे गावात घरोघरी रुग्ण आढळत असून 100 पेक्षा अधिक नागरिकांना डायरियाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर असतानाही आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
14 मे रोजी आरोग्य विभागाचे सीएचओ, डॉक्टर गवळी, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांनी गावात भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले व काही रुग्णांना औषधोपचार दिला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर साथ पसरलेली असतानाही तात्पुरता आरोग्य शिबिर (कॅम्प) न लावल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार टेंभुखेड धरण परिसरातून थेट विहिरींमध्ये पाणी सोडले जात असून कोणतीही शुद्धीकरण किंवा फिल्टर व्यवस्था नसल्याने दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरात पोहोचत आहे. याच कारणामुळे डायरियाचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मारुती पुंजाजी डाखोरे यांच्या माहितीनुसार, प्रत्येक घरात एक-दोन रुग्ण असून अनेकांना सलाईनवर उपचार सुरू आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
ग्रामपंचायत सदस्य शीतल राजेश नवले यांनी आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, आरोग्य सेवक-सेविका नियमित गावात भेट देत नसल्यामुळे साथ वेळेवर लक्षात आली नाही. जर वेळेवर पाणी तपासणी व अहवाल दिला असता तर ही परिस्थिती टाळता आली असती.
दरम्यान, गावात खाजगी डॉक्टरांकडून तात्पुरते उपचार सुरू असून आरोग्य विभागाच्या विलंबित प्रतिसादामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. तातडीने आरोग्य शिबिर, स्वच्छ पाणीपुरवठा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











