बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दि. 15 आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने आता ‘अलर्ट मोड’ सुरू केला असून, कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिला आहे. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत प्रशासनातील सर्व यंत्रणांची कडक शब्दांत कानउघाडणी करत तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले.
१ जूनपासून जिल्ह्यातील सर्व नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश देत, “कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला. कोणताही अधिकारी परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही, असा कडक नियम लागू करण्यात आला आहे.
पूरस्थितीत होणाऱ्या दुर्घटनांवर कठोर पाऊल उचलत, नदीकाठ, पूल किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी व स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस व प्रशासनाला देण्यात आले आहेत. “स्टंटबाजी म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण,” असा इशाराही देण्यात आला.
तहसीलदारांना बचाव साहित्याची तपासणी करून प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, बोटी, लाईफ जॅकेट, जेसीबी, पोकलेन, जनरेटर यांची सज्जता तपासली जाणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या किराणा पुरवठादारांची यादी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
अतिसंवेदनशील व पूरग्रस्त गावांसाठी २० मेपूर्वी सूक्ष्म आराखडे तयार करण्याचे आदेश देत, संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आधीच धान्यसाठा पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागालाही सर्पदंश व साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला.
एकंदरीत, यंदा मान्सूनमध्ये कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, सर्वांनी जबाबदारीने काम करा, अन्यथा कारवाई अटळ आहे, असा ठाम इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.











