धाड (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात धाड पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत जामठी येथील अफसर बलदार बरडे (वय ३८) याला तब्बल दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असून त्याच्या अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील युवक आणि नागरिकांवर गंभीर दुष्परिणाम होत होते. याची दखल घेत धाड पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा सखोल विचार करून ११ मे २०२६ पासून दोन महिन्यांची हद्दपारी लागू केली.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून, यापुढेही अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
धाड पोलीस स्टेशनच्या या आक्रमक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील अवैध धंद्यांना आळा बसणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











