चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) पैशांच्या वादातून सतत मानसिक छळ झाल्यामुळे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मेरा खुर्द येथील रहिवासी मुक्तार शाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी रुबीना बी अकिल शाह (वय 33) हिला सुलताना बी सलीम शेख हिने पैशांच्या कारणावरून वारंवार त्रास दिला. सुमारे दोन वर्षांपूर्वी 30 हजार रुपयांच्या व्यवहारात रुबीना बी मध्यस्थी होती. संबंधित पैसे परत न मिळाल्याने सुलताना शेख हिने रुबीना बी हिलाच जबाबदार धरत सतत धमक्या देण्यास सुरुवात केली.
“पैसे दे नाहीतर तुला व तुझ्या मुलांना घराबाहेर काढेन, जीव घेईन,” अशा धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सततच्या मानसिक त्रासामुळे रुबीना बी प्रचंड तणावाखाली होती, असेही कुटुंबीयांनी सांगितले.
६ मे रोजी सायंकाळी पुन्हा एकदा दोघींमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास रुबीना बी हिने दिपक खरात यांच्या शेतातील विहिरीतव उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ७ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणी सुलताना बी सलीम शेख हिने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, तिच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.











