बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाशी संबंधित मोठी दुर्घटना समोर आली असून जलंब ते माटरगाव दरम्यान उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या साठवणूक केंद्राला भीषण आग लागल्याने प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. या आगीत सिंचनासाठी वापरण्यात येणारे कोट्यवधी रुपयांचे पीव्हीसी पाईप पूर्णतः जळून खाक झाले आहेत.
शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ही पाईपलाईन टाकण्यात येणार होती. मात्र, आगीमुळे संपूर्ण योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून ही आग अपघाती की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव व शेगाव येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या घटनेमुळे प्रशासनाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जिगाव प्रकल्पातील ही आग नेमकी कोणाच्या हलगर्जीपणामुळे लागली, याचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरत आहे.










