चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील खैरव गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सिन्नर (जि. नाशिक) येथील एमआयडीसी परिसरात झालेल्या भीषण कार अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही हृदयद्रावक घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खैरव येथील वैभव रामदास शिंदे यांच्याकडील जेसीबीसाठी साहित्य आणण्यासाठी ते स्वतः, चालक श्रीकिसन हनुमान सुरुशे (रा. पाटोदा) आणि संकेत प्रकाश खोसे (रा. खैरव) हे तिघे सियाज कारने सिन्नर येथे गेले होते. मात्र, सिन्नर एमआयडीसीजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.
या अपघातात संकेत खोसे आणि श्रीकिसन सुरुशे यांचा जागीच मृत्यू झाला. वैभव शिंदे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच खैरवचे सरपंच गजानन शिंदे यांच्यासह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन सुरू होते.
या दुर्दैवी घटनेमुळे खैरवसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांत तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.










