spot_img
spot_img

सोयाबीनवर संकट येण्याआधीच सावध व्हा! खेर्ड्यात बांधावर उतरले कृषी तज्ज्ञ; मित्र-शत्रू किडींची करून दिली ओळख! दशपर्णी अर्कासह एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा दिला मंत्र; अनावश्यक फवारणी टाळण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

खेर्डा बु./जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ज्ञानदेव राजनकर) सोयाबीन पीक सध्या फुलोरा अवस्थेत असतानाच किडी आणि रोगांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उतरला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत बुधवार, १२ ऑगस्ट रोजी खेर्डा बु. येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद येथील शास्त्रज्ञ अनिल तु. गाभने यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. पिकावरील मित्र आणि शत्रू किडींची ओळख करून देत मित्र किडींचे संवर्धन करण्याचा सल्ला त्यांनी दिला. अनावश्यक कीटकनाशकांची फवारणी टाळून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन पिकाचे प्रभावी संरक्षण करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आत्माचे तालुका समन्वयक सागर राऊत यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, वापर आणि किडींच्या नियंत्रणातील महत्त्व समजावून सांगितले. किडी किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मनमानी फवारणी न करता कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.कार्यशाळेस एस. एस. शेळके, ए. एम. गाडगे, योगेश म्हसाळ, रवींद्र तायडे, दुर्योधन उमाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!