जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून राजुरा शिवारात अज्ञात व्यक्तीचे धडापासून वेगळे झालेले मुंडके शेतात आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मुंडक्यावरील केस व मांस मोठ्या प्रमाणात गळालेले असल्याने दृश्य अत्यंत भीषण होते.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला केवळ मुंडके आढळले होते, मात्र परिसरातील जंगल भागात शोधमोहीम राबविल्यानंतर काही अंतरावर धडही सापडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात गर्दीही जमली होती.
दरम्यान, बुलढाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही बॉडी महिलाची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खून आहे की अन्य काही प्रकार, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.










