बुलढाणा (हॅलो बुलडाणा/प्रतिनिधी) सिंदखेडराजा येथील भूमी अभिलेख कार्यालयात गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार उघडकीस येत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दूसरबीड येथील शेतकरी नाथा किसन साळवे यांचे पुत्र प्रदीप साळवे यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत धक्कादायक आरोप केले आहेत.
फेब्रुवारी २०२४ मध्ये अंतिम निकाली निघालेल्या पोटहिस्सा मोजणी प्रकरणात कार्यालयातील कर्मचारी मारोती थोरवे, उदय खराते आणि भूमापक प्रकाश शिंदे यांनी संगनमत करून बेकायदेशीररीत्या मोजणी केल्याचा आरोप आहे. अर्जदाराचा ताबा नसताना,सर्व सहधारकांची मोजणी न करता चुकीच्या पद्धतीने मोजणी करून जागेवर खूणा दाखवण्यात आल्या. इतकेच नव्हे तर अनधिकृत नोटीस काढून अधिकारांचा गैरवापर केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाची सुनावणी होऊन २१ ऑगस्ट २०२४ रोजी उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी फेरमोजणी व दोषी कर्मचाऱ्यांवर नियम १० नुसार कारवाईचे आदेश दिले होते. मात्र तब्बल १८ महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या इच्छाशक्तीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
नवीन मोजणी नकाशातही गंभीर तफावत आढळून आली असून समृद्धी महामार्गासाठी संपादित जमीन मुद्दाम वाढवून दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारदाराला “आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही” अशी धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत असून दोषींना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, की दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरूच राहणार, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.











