पिंपळगाव राजा (हॅलो बुलडाणा) एका शिक्षकाच्या छळामुळे विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली. शिक्षकाने प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्याला उत्तर विचारले होते. उत्तर न आल्याने शिक्षकाने शारीरिक शिक्षा देऊन विद्यार्थ्याला अपमानित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली जीवन यात्रा संपवून टाकली.विनायक महादेव राऊत (वय15) रा. वसाडी बु.असे
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तर आरोपी शिक्षकाचे नाव गोपाल मारोती सुर्यवंशी रा.खामगाव असे आहे.
विनायक महादेव राऊत हा विद्यार्थी जय बजरंग विद्यालयात शिकत होता. वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे वर्गशिक्षक गोपाल सुर्यवंशी यांनी त्याला उठबश्या काढायची शिक्षा दिली. विनायकने पाय दुखत असल्याचे कारण सांगून ऊठबशा काढण्यासाठी नकार दिल्याने शिक्षकाने त्याला कपडे काढण्यासाठी सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान या मानसिक धक्क्यामुळे अपमानित झालेल्या विनायकने आत्महत्या केली.याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.दरम्यान विनायक खिशामध्ये सुसाईट नोट सापडली असून, त्यात शिक्षकाने मानसिक छळ केला व वडीलांबाबत अपशब्द वापरून अपमान केल्याचा उल्लेख आहे.