बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.त्यांची निवड अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी याचीके द्वारे केली आहे. दरम्यान ही निवडणूक याचीका फेटाळून लावण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.न्यायालयाने सोमवारी या अर्जाची दखल घेऊन शेळके यांना यावर 18 जुलै पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर प्रकरणावर न्या.अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली.आमदार गायकवाड यांनी शेळके यांच्या निवडणूक याचीके ला दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डर मधील नियम 11 आणि लोकप्रतिनिधत्व कायद्यातील कलम 86 (6)अंतर्गत विरोध केला आहे.त्यांचे वकील मोहित खजांची यांनी ही याचीका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 81 (3 ) मधील निकषांसह विविध तरतुदींची पूर्तता करीत नाही,असे सांगून आमदार गायकवाड यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावणे आवश्यक आहे,याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तर निवडणूक आयोगाने ईव्हीएम द्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही, ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते.त्यांचे पालन झाले नाही असा आरोप जयश्री शेळके यांचा आहे. शेळके कडून ॲड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.