जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) जलसंधारणाच्या नावाखाली सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील वावडी हरदो शेतशिवारात सुरू असलेल्या सिमेंट नालाबंध कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
खामगाव जलसंधारण विभागाच्या माध्यमातून निरव व कोरडी नदीवर सध्या तीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. मात्र, या कामामध्ये नदीतील मातीमिश्रित वाळू, निम्न प्रतीचे दगड व अत्यल्प लोखंड वापरण्यात आल्याचा आरोप होत असून, खडी-सिमेंटचे प्रमाणही अत्यंत चुकीचे असल्याचे उघड झाले आहे.माहितीनुसार, राज्य शासनाने २०११-१२ पासून टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाअंतर्गत सिमेंट बंधाऱ्यांचा उपक्रम हाती घेतला आहे. हे बंधारे भूजल वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. पण, सुनगाव प्रकल्पातील काम पाहता केवळ कागदोपत्री गुणवत्तेचे ढोल बडवले जात असल्याचे दिसते.
शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता कवाडे व संबंधित ठेकेदारावर चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा, मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जलसंधारणासारख्या संवेदनशील कामांमध्ये असा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.













Total Users : 3430851