चिखली (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील भोरसा-भोरसी गावातील बैलांची संख्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घटत असून, सन २०२६-२७ मध्ये गावात केवळ ९० बैलांची नोंद झाली आहे. उत्साही शेतकरी रविंद्र कृष्णराव भुसारी यांच्या पुढाकारातून गेल्या ३६ वर्षांपासून गावातील बैलसंख्येची नोंद केली जात असून, या नोंदीतून पारंपरिक शेतीतील बैलांचे महत्त्व आणि त्यांची दिवसेंदिवस कमी होत चाललेली संख्या स्पष्टपणे समोर येत आहे. भोरसा-भोरसी गावात पूर्वी शेतीच्या कामासाठी बैलजोडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. नांगरणी, वखरणी, पेरणी, मालवाहतूक यासह विविध शेतीकामे बैलांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, मागील काही वर्षांत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व अन्य आधुनिक कृषी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतीतील बैलांचा वापर कमी झाला आहे.
▪️३६ वर्षांच्या नोंदीतून घट स्पष्ट!
शेतकरी रविंद्र कृष्णराव भुसारी यांनी गेल्या ३६ वर्षांपासून केलेल्या नोंदी पाहिल्यास बैलांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येते. सन १९९९ मध्ये भोरसा-भोरसी गावात ३२८ बैलांची नोंद होती. त्यानंतर सन २००४ मध्ये ही संख्या ३३२ वर पोहोचली होती. हा आकडा सर्वाधिक होता. मात्र, त्यानंतर बैलसंख्येत सातत्याने घट होत गेली.
यानंतरच्या नोंदीनुसार सन २०२३ मध्ये ९६, सन २०२४ मध्ये ९२ तर सन २०२५ मध्ये ८९ बैल होते. आता सन २०२६-२७ मध्ये ही संख्या 1 ने वाढून 90 झाली आहे. अवघ्या काही वर्षांत बैलांची संख्या कमी होत असल्याने पारंपरिक पशुधन व्यवस्थेबरोबरच शेतीच्या नैसर्गिक पद्धतींच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
▪️यंत्रे वाढली, बैलांची संख्या घटली!
आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरण अपरिहार्य झाले आहे. कमी वेळेत अधिक क्षेत्राची मशागत करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर व आधुनिक साधनांचा वापर करीत आहेत. दुसरीकडे बैलांचे संगोपन करण्यासाठी लागणारा चारा, देखभाल व पशुवैद्यकीय खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बैलजोडी ठेवण्याऐवजी यांत्रिक शेतीला प्राधान्य देत आहेत. मात्र बैलांची घटती संख्या ही केवळ ग्रामीण संस्कृतीच्या दृष्टीनेच नव्हे, तर पारंपरिक व सेंद्रिय शेतीच्या दृष्टीनेही चिंतेची बाब आहे.












Total Users : 3430157