जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) शहरातील पद्मावती नदीवर आसरा माता मंदिराजवळ सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील ठेकेदाराने गुणवत्तेचा फज्जा उडवत नियमांचे उल्लंघन करून काम सुरू ठेवले आहे.सदर कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, नदीतील रुळी आणि रेतीचाच मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. सिमेंटचे प्रमाण अत्यल्प असल्याने भिंत हाताने ढकलली तरीही पडण्याजोगी झाली आहे. एवढेच नाही, तर संरक्षण भिंतीखाली पोकलांड तयार करून जेसीबीच्या साहाय्याने नाल्यातील माती खोदून भरण केले जात आहे.
विशेष म्हणजे, या बांधकामाचा तपशील दर्शवणारे कोणतेही फलक किंवा माहिती बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. ठेकेदाराने मनमानी करत प्रकल्पाच्या निधीची माहिती गुप्त ठेवली आहे. शासकीय पैशांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप होत आहे.याशिवाय, आसरा माता मंदिराच्या प्राचीन वारसा स्थळाला धोका निर्माण झाला आहे. भारतीय पुरातत्व विभागाची पूर्वपरवानगी घेण्यात आली का, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. पुरातत्व महत्त्वाच्या वास्तूंचे नुकसान होत असतानाही प्रशासन डोळे झाकून बसले आहे.
शहरवासीयांनी त्वरित चौकशीची मागणी केली असून, कामाची गुणवत्ता तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा, शासनानेच या भ्रष्टाचाराला मूकसंमती दिली असल्याचे समजले जाईल!










