बुलडाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन सोहळा दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी विविध शाळांची प्रभातफेरी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच कार्यक्रमासाठी स्त्री, पुरुष व लहान मुलांचा जमाव असतो. रविवार (दि.26 जानेवारी) हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बुलढाणा शहराच्या मुख्य मार्गावर, रस्त्यावर आठवडी बाजार भरत असतो. त्यामुळे या ठिकाणी गर्दी निर्माण होऊन रहदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 5 अन्वये कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीकोणातून बुलढाणा शहरामध्ये रविवार दि. 26 जानेवारी रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्यात येत असून आठवडी बाजार पुढील दिवशी भरण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.











