मेहकर (हॅलो बुलढाणा) हातात रिकामी भांडी घेऊन पाचला गावातील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी होणारी परवड थेट आमदारांसमोर मांडली. कोरड्या दुष्काळाच्या झळांनी मेहकर तालुक्यातील या गावाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामस्थांच्या व्यथेची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज गावाला भेट देऊन पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी केली. गावच्या विहिरीची पाणीपातळी घटल्याचे दिसताच, ‘पाणी लागेपर्यंत विहिरीचे खोलीकरण करा,’ असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन विहीर अधिग्रहित करण्याची सूचनाही खरात यांनी केली. विहिरीच्या खोलीकरणासह पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी आवश्यक निधी आपल्या आमदार निधीतूनही उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. पाहणीवेळी संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जलजीवनची कामे तातडीने पूर्ण करा!
गावात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही आमदारांनी दिले. टंचाईवर उपाय करताना ग्रामस्थांना कोणत्याही परिस्थितीत दूषित पाणीपुरवठा होऊ देऊ नका, अशी ताकीद त्यांनी प्रशासनाला दिली. गावाला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
विहीर खोलीकरण, नवीन विहिरीचे अधिग्रहण आणि जलजीवनची कामे पूर्ण करणे, या तिन्ही बाबींवर आता प्रशासनाला प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे






Total Users : 3836386